नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री आझम खान यांच्या रामपूर येथील निवासस्थानावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) आणि आयकर विभागाने छापा टाकला आहे. आज सकाळीच दोन्ही विभागांचे पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी घराला चारही बाजूंनी घेरल्यानंतर तपास सुरू केला. आझम खान यांना समाजवादी पार्टीमध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याखालोखाल क्रमांक दोनचे नेते मानले जातात.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने लखनौ, मेरठ, रामपूर आणि गाझियाबादसह आझम खान यांच्या घरावर छापे टाकले. २०१९ मध्ये जौहर विद्यापीठाची जमीन हडप केल्याप्रकरणी आझम खान यांच्यावर ३० गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांना भूमाफिया घोषित केले. ईडीने आझम खान यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता.
लखनौहून ईडीची टीम अनेक वेळा रामपूरला पोहोचली आणि तपास केला. गुरुवारी सकाळी ईडी त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी घराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. पोलिस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, आझम खानविरोधात जुन्या प्रकरणात तपास सुरू आहे.