उत्तर प्रदेशातील दादरी ब्लॉकमधील प्राथमिक विद्यालय पटाडीमधील मुख्य अध्यापकाच्या पदावर कार्यरत असलेल्या जोगेंद्र सिंह यांची बारावीची मार्कशिट बनावट निघाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी ऐश्वर्या लक्ष्मी यांनी त्यांच्या २६ वर्षांच्या नोकरीदरम्यान मिळालेले वेतन आणि भत्त्यांची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच खंड शिक्षणाधिकारी दादरी यांनी या प्रकरणी एफआयआरही नोंदवली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर १९९७ मध्ये जोगेंद्र सिंह यांची नियुक्ती अनुकंपा तत्त्वाखाली झाली होती. त्यावेळी त्यांना अप्रशिक्षित ग्रेड पे स्केल ८५० रुपयांवर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांना प्रशिक्षित ग्रेड पे स्केल ४५०० वर ठेवण्यात आले. तर सध्या त्यांना तब्बल ८० हजार रुपये दरमहा वेतन मिळत होतं.
मेरठमध्ये राहणाऱ्या मनोज कुमार यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये चार शिक्षकांची तक्रार केली होती. त्यांनी आपल्या तक्रार पत्रामधून चारही शिक्षकांच्या शैक्षणित कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सहाय्यक मंडलीय शिक्षण संचालक, मेरठ दिनेश कुमार यादव यांनी गौतमबुद्ध नगरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ऐश्वर्या लक्ष्मी यांना तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या तपासामध्ये जोगेंद्र सिंह यांचं बारावीचं गुणपत्रक बनावट असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर कारवाई करून १२ मे रोजी जोगेंद्र सिंह यांची सेवा समाप्त करण्यात आली.
विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जोगेंद्र सिंह यांच्याविरोधात ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जोगेंद्र सिंह यांना २६ वर्षांच्या सेवेदरम्यान मिळालेले वेतन परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट गुणपत्राची माहिती मिळाली नसती तर जोगेंद्र सिंह हे २०३६ पर्यंत सेवेत राहिले असते. शाळेतून मिळालेल्या माहितीनुसार जोगेंद्र सिंह वेळेवर शाळेत येत असत.