उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील पुरणपूर भागातून नवविवाहितेचे असे कृत्य समोर आले आहे, ज्याने तिचा पतीसह सासरच्या सर्वच मंडळींना धाक्का बसला. लग्नानंतर केवळ आठच दिवसांत संबंधित नवविवाहितेने रात्रीच्या वेळी पतीला नशेच्या गोळ्या दिल्या आणि मामासोबत धूम ठोकल्याची घटना घडली आहे.
सकाळी पती झोपेतून उठला मात्र त्याला घरात पत्नी दिसली नाही. यानंतर त्याने सासरच्या लोकांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर संबंधित विवाहिता तिच्या मामाकडे गेल्याचे समोर आले. पीडित पतीने पोलिसांत तक्रार देत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
पीडित पतीने म्हटले आहे की, 22 ऑक्टोबर रोजी खुटार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहणाऱ्या तरुणीसोबत त्याचे लग्न झाले होते. पत्नीने रात्रीच्या सुमारास त्याला नशेच्या गोळ्या दिल्या. यामुळे त्याला गाढ झोप लागली. यानंतर, रात्रीच्या सुमारास पत्नी तिच्या मामासोबत पळून गेली. तसेच, पत्नीने घरात ठेवलेले 50 हजार रुपयेही सोबत नेल्याचा आरोप पतीने केला आहे.
दरम्यान, झोपेतून उठल्यानंतर, संबंधित पीडित पतीला चक्कर येत होती. त्याच्या बेडवर झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत.