लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून उत्तर प्रदेशभाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर कुरबुरी सुरू आहेत. तसेच मागच्या काही काळापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यात पडद्याआड सुरू असलेले मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. त्यामधून उत्तर प्रदेशमध्ये नेतृत्व बदलाची चर्चाही सुरू झाली होती. मात्र केंद्रातील नेत्यांकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. त्यानंतरही आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपाच्या ओबीसी कार्यसमितीच्या बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना केशव प्रसाद मौर्य यांनी राज्यात भाजपा अतिआत्मविश्वासामुळे पराभूत झाल्याचे मान्य केले. तसेच सरकारच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही. पक्षच निवडणूक लढतो आणि पक्षच निवडणूक जिंकतो, असं विधान करत त्यांनी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
केशव प्रसाद मौर्य यांनी दावा केला की, समाजवादी पक्षामध्ये पुढच्या काळात आणखी पळापळ होणार आहे. यावेळी मौर्य यांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना उत्तर देण्याचंही आवाहान केलं. ते म्हणाले की, मीडियामध्ये खूप फेकू लोक आहेत. माध्यमांमध्ये काय चाललंय, सोशल मीडियावर काय चाललंय, याकडे फार लक्ष देऊ नका. मात्र सतर्क राहा आणि प्रत्युत्तर द्या.
केशव प्रसाद मौर्य पुढे म्हणाले की, केवळ सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानं काही होणार नाही. अखिलेश आणि काँग्रेसच्या सोशल मीडियाला उत्तर द्यावं लागेल. मागास वर्गाला आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडण्यासाठी रणनीती आखण्यासाठी भाजपाने सोमवारी ओबीसी कार्य समितीची बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तिथे पोहोचण्यापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिथून काढता पाय घेतला.