Fake TTE In Railway : सोशल मीडियाच्या या जगात नेहमी नाना प्रकारच्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोणी प्रसिद्धीसाठी हे नाटक करतं... तर काहीजण केवळ लाईक्ससाठी हास्यास्पद गोष्टी करत असतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचाच फायदा घेत एका तरूणीने चक्क टीटी अर्थात प्रवासी तिकीट परीक्षक (Traveling Ticket Examiner) बनून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या बनावट टीटीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ती प्रवाशांना मी टीटी असल्याचे सांगून तिकीट दाखवण्यास सांगत आहे.
उत्तर प्रदेशातील झांसी येथे पातालकोट एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. संबंधित तरुणीचे हावभाव पाहून प्रवाशांना ती बनावट टीटी असल्याचा विश्वास पटला. मग त्यांनी तिची विचारपूस करताच तिचा खरा चेहरा समोर आला. प्रवाशांनी तिला पोस्टिंग आणि इतर बाबींबद्दल विचारले असता, बनावट टीटी गडबडली. मग प्रवाशांचा संशय वाढला आणि सत्य समोर आले. प्रवाशांनी तिला जॉब नंबर आणि इतर काही पुरावे दाखवण्यास सांगितले. आयडी कार्डबद्दल प्रवाशांनी विचारले असता तरुणीच्या उत्तराने एकच खळबळ माजली.
दरम्यान, काही प्रवाशांनी बनावट टीटीला कोंडीत पकडल्यानंतर तिच्या सर्व लक्षात आले. मग तिने सावध पवित्रा घेत जॉब नंबरबद्दल बोलणे टाळले. त्यानंतर तिने तिकीट नका दाखवू असे म्हणत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पंरतु, हुशार प्रवाशांनी तिची फिरकी घेत आमच्याकडे तिकीट नसल्याचे आवर्जुन सांगितले. मग तिने आणखी सांगितले की, मॅडमच्या सांगण्यावरुन मी इथे आली आहे... माझे इथे काही चालत नाही. मी मध्य प्रदेशात असते. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने संबंधित प्रवाशाला आपल्यासोबत चल असे सांगून स्वत:ला खरे ठरवण्याचा प्रयत्न केला. तिथेही तिला अपयश आल्याने अखेर तिचा भांडाफोड झाला.