उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिचा मुलगा आणि सुनेला ते निसंतान असल्याने घराबाहेर पडण्याचे फर्मान सुनावले. एवढंच नाही तर जेव्हा मुलगा आणि सून घराबाहेर पडण्यास तयार झाले नाही. तेव्हा महिलेने त्यांना मारहाण करवली. या महिलेच्या सुनेने आरोप केला की, सासू तिच्या पतीचं दुसरं लग्न लावून देऊ इच्छित होती. मात्र पती माझ्या बाजूने उभे राहिले. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे.
ही घटना कानपूरमधील बिधनू परिसरात घडली आहे. येथे ममता सेंगर नावाच्या महिलेचा मुलगा रजत याचा विवाह खुशबू सिंह हिच्याशी झाला होता. मात्र लग्नाला नऊ वर्षे उलटल्यानंतरही अपत्य न झाल्याने या पती-पत्नीसोबत ममता यांची दररोज भांडणं व्हायची. हा वाद एवढा वाढला की प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले.
खुशबू यांनी आरोप केला की, तिचे सासरे आणि दिराने मिळून पती रजत यांना मारहाण केली. हे सर्व सासूच्या सांगण्यावरून झालं. खुशबू हिची सासू ममता सेंगर या परिसरातील माजी नगरसेविका आहेत. मला सोडून द्यावे, यासाठी माझी सासू माझ्या पतीवर दबाव आणत होती. मात्र माझे पती मला सोडू इच्छित नव्हते. माझ्या पतीचं दुसरं लग्न लावून देऊ इच्छित होत्या. यावरून वाद व्हायचे.
दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी खुशबू यांनी डीसीपी साऊथ यांच्या कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली. मात्र दुसऱ्याच दिवशी सासू आणि सुनेमध्ये समोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एडीसीपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, काल सुनेने तक्रार दाखल केली होती. मात्र आता त्यांच्यात तडजोड झाली आहे. या प्रकरणी कुठलीही कारवाई होऊ नये असे, सुनेने सांगितले.