उत्तर प्रदेशच्या अमरोह येथे रील बनवण्याच्या नादात युवकांनी धक्कादायक आणि अनेकांचा जीव धोक्यात घालणारा स्टंट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी युवकांना अटक केली आहे. व्हायरल व्हिडिओत, एक युवक आपल्या बुलेटमध्ये स्वत: पेट्रोल भरताना दिसून येतो. तसेच, पेट्रोलची टाकी फुल्ल झाल्यानंतर पेट्रोल टाकीवरुन गाडीवर वाहत असल्याचे दिसून येते. मात्र, पेट्रोल मीटरचे बटण बंद करण्याऐवजी तो युवक बुलेटलाच पेट्रोलने अंघोळ घालत असल्याचेही दिसून येते.
तरुणाचा बुलेटला अंघोळ घालतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावर, नेटीझन्से संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून युवकावर कारवाईची मागणी केली होती. सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याच्या नादात या तरुणाने अनेकांचा जीव धोक्यात घालण्याचं काम केलंय. एखादी मोठी दुर्दैवा घडली असती जबाबदार कोण? असा सवालही नेटीझन्सने विचारलाय. अमरोहा जनपदच्या हसनपूर कोतवाली परिसरातील ही घटना आहे.
श्रीमंत कुटुंबातील लाडल्याने स्टंटबाजी करण्यासाठी, रिल्स बनवण्यासाठी जीवाशी खेळण्याचा स्टंट करत होता. या स्टंटच्या माध्यमातून रिल्स बनवून तो सोशल मीडियावर फेमस होण्याचा प्रयत्न करत होता. याप्रकरणी, अमरोहा पोलिसांनी व्हिडिओची पाहणी करुन तपास केला. त्यानंतर, युवकाला ताब्यात घेतलं आहे. तसेच, पेट्रोल पंपवरील सेल्समनसह आणखी तिघांनाही अटक करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिकारी श्वेताभ भास्कर म्हणाले की, पेट्रोल पंपावर बाईकला पेट्रोलने अंघोळ घातल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शमी, सेल्समन तरुण, आणि अजहर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या अटकेनंतर तरुणांनी माफी मागितली असून यापुढे असे स्टंट न करण्याची शपथच घेतली आहे.