केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशातील मोहनलाल गंजचे खासदार कौशल किशोर यांच्या लखनऊ येथील घरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विनय श्रीवास्तव असे मृताचे नाव आहे. किशोर यांचा मुलाचा विनय हा मित्र होता आणि त्याच्यासोबतच राहत होता. पोलिसांनी परवानाधारक पिस्तूल ताब्यात घेतले असून शव ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
विनय श्रीवास्तवची पिस्तूलमधून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हे पिस्तुल किशोर यांच्या मुलाच्या नावावर होते. या प्रकरणाची खबर लागताच डीसीपी राहुल राज, एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त दाखल झाला होता.
पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. विनयच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करत पोलिसांत एफआयआर नोंद केला आहे. विनयच्या डोक्यावर जखमा आहेत. घरामध्ये रात्री सहा जण आले होते. तिथे त्यांनी पार्टी केल्याचे समोर आले आहे. यानंतर विनयवर गोळी झाडण्यात आली आहे. ज्या पिस्तुलमधून गोळी झाडली ते किशोर यांच्या मुलाचे परवाना असलेले पिस्तुल होते, असे डीसीपी यांनी सांगितले.
घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. फुटेजचीही तपासणी केली जात आहे.