Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरातील रामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अगदी वेगात सुरू आहे. ही तयारी हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्ती येणार असून, सुरक्षेची चोख व्यवस्था योगी आदित्यनाथ सरकारकडून केली जात आहे. यासाठी राम मंदिर परिसरात एआय तंत्रज्ञानाने युक्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या जवळपास २५०० असेल, असे सांगितले जात आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या नगरीला हळूहळू छावणीचे स्वरूप येत आहे. अयोध्येतील प्रत्येक कानाकोपरा सुरक्षा कवचाखाली आणला जात आहे. राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट योगी सरकारने तयार केली आहे. तसेच CRPF, UPSSF, PAC आणि सिव्हिल पोलीस सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय, परवानगीशिवाय अयोध्येत ड्रोन उडवता येणार नाहीत. रामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरक्षेच्या दृष्टीने गुप्तचर विभाग सक्रिय राहणार आहे.
अयोध्येतील वाहतुकीत मोठा बदल
२२ जानेवारी २०२४ आणि २३ जानेवारी २०२४ रोजी अवजड वाहनांना अयोध्या शहरात प्रवेश दिला जाणार नाही. या सोहळ्यासाठी ज्यांना निमंत्रित केले आहे, त्यांच्या आगमनासाठी उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती वेळोवेळी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. नवीन घाट येथे असलेल्या यलो झोन येथे कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. हायटेक कॅमेऱ्यांद्वारे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. कोणतीही संशयास्पद परिस्थिती दिसल्यास नियंत्रण कक्षाकडून तत्काळ पोलीस चौकी आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच AI आधारित कॅमेरे बसवले जात आहेत.
दरम्यान, राम मंदिरासाठी लवकरच नवीन सुरक्षा योजना लागू केली जात आहे. याअंतर्गत कोणतीही व्यक्ती तपास केल्याशिवाय मंदिराजवळ जाऊ शकणार नाही. ठिकठिकाणी चेकिंग पॉइंट करण्यात येणार आहेत. याशिवाय २५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. भविष्यात शरयू नदी किनारी सुरक्षा बळकट करण्यात येणार आहे. तसेच नदीकाठावर उत्तम सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.