रामभक्तांच्या ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज प्रभू श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजली असून देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असं म्हणत भाषणाची सुरुवात केली. देशभरातून दिग्गजांची मांदियाळी अयोध्या नगरीत पोहोचली होती. आपल्या भाषणानंतर मोदींनी सर्वांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यावेळी, देशातील बड्या हस्तीही रांगेत दिसून आल्या.
"२२ जानेवारी २०२४ चा हा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे... कॅलेंडरवर लिहिलेली ही तारीख नाही, तर नव्या काळचक्राचा उदय आहे.", असे मोदींनी म्हटले. "शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आला आहे, माझं मन अजूनही त्या क्षणात गढून गेले आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत" असं पंतप्रधान मोदींनी भाषणात म्हटलं. आपल्या भाषणानंतर मोदींनी व्यासपीठावरील संतांचे दर्शन घेऊन मार्गक्रमण केले. त्यानंतर, समोर उभे असलेल्या दिग्गजांच्या, निमंत्रितांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कारही केला.
देशभरातून प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या ७ हजार दिग्गजांना मोदींनी भेटून नमस्कार केला. ज्यांच्या भेटीसाठी दररोज रांगा लागतात, ते दिग्गजही येथे रांगेत पाहायला मिळाले. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, संत, महाराज आणि राजकीय नेतेही दिसून आले. बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, उद्योगपती मुकेश अंबानी हेही सपत्निक दिसून आले. तर, श्री श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव यांच्यासह अनेक मोठमोठे संत, साधूही येथे दिसून आले. मोदींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. यावेळी, अमिताभ बच्चन यांनाही हात जोडून नमस्कार केला.