नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारचे माजी मंत्री आणि लखनौ पूर्वचे आमदार आशुतोष टंडन उर्फ गोपाल जी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. आशुतोष टंडन हे योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रीही होते. आशुतोष टंडन यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरही त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.
आशुतोष टंडन यांच्या निधनानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि लखनौ पूर्वचे आमदार आशुतोष टंडन उर्फ 'गोपालजी' यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे राजकीय जीवन लखनौच्या जनतेच्या सेवेसाठी समर्पित होते. पक्ष मजबूत करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लखनौ आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. या दु:खाच्या प्रसंगी, मी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो, असं राजनाथ सिंह म्हणाले.
आशुतोष टंडन उर्फ गोपाल जी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश आणि बिहारचे राज्यपाल दिवंगत लालजी टंडन यांचे पुत्र होते. लालजी टंडन हे यूपीमधील भाजपाचे प्रमुख आधारस्तंभ आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र आणि सहकारी होते.