नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात. त्यांच्या मंत्रालयाने आतापर्यंत देशभरात अनेक ठिकाणी लवकर महामार्गा बनवण्याचे विक्रम केले आहेत. आता नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या नावावर एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. NHAI ने फक्त 100 तासांत 100 किलोमीटर गाझियाबाद-अलिगड द्रुतगती (NH-91) रस्ता तयार करण्याचे काम केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, NHAI ने या कामासाठी 200 रोड रोलर आणि विविध मशिनरींसह 250 अभियंते आणि सूमारे 80 हजार मजूरांना कामाला लावलं होतं. या सर्वांनी मिळून 100 तासांत 112 किलोमीटर रस्ता तयार करण्याचा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी 105 तासात 75 किलोमीटर रस्ता बनवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस वेवर 15 मे रोजी सकाळी 10 वाजता काम सुरू झाले आणि आज पहाटे 2 वाजता 100 तास पूर्ण झाले. हा 6 लेनचा एक्स्प्रेस वे आहे.
हे बांधकाम क्यूब हायवेज L&T च्या सहकार्याने करत आहे. विश्वविक्रम करण्यासाठीच हा जलद कामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सहा लेनचा रस्ता करताना सुशोभीकरणाचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. रस्त्याच्या कडेला योग्य रोषणाई व सुंदर दुभाजक करण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर हिरवळ असून झाडेही लावली आहेत.