गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. येथील क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल विहारच्या समोर स्कूल बस आणि कार यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात कारचे पूर्ण नुकसान झाले असून त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवर स्कूल बस सकाळी चुकीच्या दिशेने येत असताना कारला धडकली. यावेळी स्कूल बसमध्ये एकही शाळकरी मुलगा नव्हता. त्यात फक्त बस चालक होता. यामुळे मोठी हानी टळली. मात्र, या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून तपास व मदतकार्य सुरू आहे. तसेच, स्कूल बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याआधी काल रात्री उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्येही अपघात झाला. यावेळी टेम्पो आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला, तर जण जखमी झाले.