उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल काही दिवसांपूर्वी बलिया येथे गेल्या होत्या. त्या दौऱ्यावेळी सीएमओ ऑफिसने त्यांच्या कार्यक्रमामध्ये एका अशा कर्मचाऱ्याची ड्युटी लावली ज्याचा आधीच मृत्यू झालेला होता. जेव्हा ही गोष्ट उघड झाली तेव्हा खूप गोंधळ उडाला. त्यानंतर आता आरोग्य विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आता गव्हर्नरांच्या कार्यक्रमामध्ये मृत कर्मचाऱ्याची ड्युटी लावल्याच्या आरोपाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) कार्यालयातील एका लिपिकाला निलंबित करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयपती द्विवेदी यांनी सांगितले की, सीएमओ कार्यालयातील लिपिक बृजेश कुमार यांना शनिवारी तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे. तर सीएमओने सांगितले की, लिपिक बृजेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या कार्यक्रमामध्ये गंभीर चूक केली होती. कुमार यांनी राज्यपाल पटेल यांच्या कार्यक्रमात कथितपणे एका मृत कर्मचाऱ्याला ड्युटीवर तैनात केले होते. तसेच भोजनाचं परीक्षण करण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याची ड्युटी लावली नव्हती. आता बृजेश कुमार याच्याविरोधात अनुशासनात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.