उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील एका घरात आनंदाचे वातावरण होते. लोक आनंदात नाचत होते, त्याचवेळी घरातील एक मुलगीही नाचू लागली. पण याच दरम्यान एक भयंकर घटचना घडली आहे. डीजेच्या तालावर नाचणाऱ्या एका मुलीचे केस जनरेटरच्या पंख्यामध्ये अडकले आणि त्यानंतर ती मुलगी पंख्याच्या दिशेने ओढली गेली. ही घटना सैदाबाद गावात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकल्याने तिच्या त्वचेला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला. मुलीच्या डोक्यावर तब्बल 700 टाके घालण्यात आले. तिची प्रकृती सध्या ठीक असून आता ती शुद्धीवर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंदाच्या क्षणी, जेव्हा सर्व नातेवाईक आणि मुलगी डीजेच्या तालावर नाचत होते. पण एका छोट्याशा चुकीमुळे तिचे केस जनरेटरच्या पंखात अडकले.
कोणीतरी तिचे केस जोरात ओढल्यासारखं तिला वाटले आणि ती त्याच वेळी बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा ती थेट रुग्णालयात होती आणि तिची प्रकृती गंभीर होती. मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला गावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले आहे, मात्र आता घरातील वातावरण थोडे गंभीर बनले असून लग्न शांततेत पार पाडण्याचा विचार आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या उपचाराला बराच वेळ लागेल. डोक्यावरील त्वचा गेल्यामुळे स्थिती गंभीर आहे. जखम बरी झाल्यानंतरच तिच्या डोक्यावर केस पुन्हा येतील की नाही हे समजेल. डॉक्टरांच्या मते, हे 4-5 महिन्यांनंतरच हे कळेल. गरिबीमुळे मुलीचे सीटी स्कॅन अद्याप झालेले नाही. मुलीच्या उपचारासाठी वडिलांना पैशांची गरज असून मुलीचे लग्नही तोंडावर आले आहे. मात्र, कुटुंबातील नातेवाईक मदतीसाठी पुढे आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.