जौनपूर - आपल्या लेकरांसाठी आई-वडिल जिवाची बाजी लावतात. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मुलांच्या जीवाची काळजी घेतात, त्यांना जपतात. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील एका आजीने अशीच हिंमत दाखवली. घरात रात्री नातीसोबत झोपली असताना आजीला कोब्रा साप दिसला, तो नातीकडे सरपटत जातोय हे पाहताच आजीने कुठलाही विचार न करता त्या कोब्रा सापाला आपल्या हातात पकडला. त्यावेळी, कोब्राने आजीच्या हाताला दंश केला. दुर्दैवाने रुग्णालयात उपचारादरम्यान आजीचा मृत्यू झाला. मात्र, नातीचा जीव वाचविण्यासाठी वृद्ध आजीने जीवाची बाजी लावली.
उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील शाहगंज तालुक्यातील अर्गपूर कला गावातील ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. नातीकडे झेपावणाऱ्या कोब्राला पाहून आजीने आपल्या हातात कोब्रा पकडला. त्यावेळी, सापाने दंश केल्यामुळे आजीने आवाज केला. आजीच्या आवाजाने घरातील इतर सदस्या धावत पळत आले. आजीला साप चावल्याने त्यांनी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात आजीला मृत घोषित करण्यात आले. या घटनेत आजीने पकडलेल्या सापाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. आजीने दाखवलेल्या हिंमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सीता देवी (७२) असं या हिंमतवान आजीचं नाव असून ती आपल्या २४ वर्षीय नातीसमवेत घरात झोपली होती. त्यानंतर, रात्री उशिरा घरातील खाटावर कोब्रा साप आला, सापाच्या हालाचालीने आजीला जाग आली. त्याचवेळी, हा साप आपल्या नातीकडे जात असल्याचे पाहून आजीने पटकन सापाला पकडले आणि मोठ्याने आवाज दिला. दरम्यान, सापाने आजीच्या हाताला दंश केला. त्यानंतर, नातेवाईकांनी आजीला रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी आजीला मृत घोषित केले. या घटनेची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा असून आजीच्या धाडसाचं कौतुक होत आहे. तर, सोशल मीडियावर व्हायरल फोटो पाहून नेटीझन्सनेही आजीच्या हिंमतीला दाद दिली आहे.