वाराणसी: वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) यांना ज्ञानवापी मशीद परिसरात सापडलेल्या 'शिवलिंग'ची कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने कार्बन डेटिंगच्या मागणीबाबतची याचिका फेटाळून लावली होती.
गेल्या वर्षी ज्ञानवापी परिसरात कमिशनिंगची कार्यवाही करण्यात आली होती. यादरम्यान, 16 मे 2022 रोजी कॅम्पसमध्ये एक कथित शिवलिंग आढळून आले, ज्यासाठी ASI कडून वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आता हायकोर्टाने ASI ला कॅम्पसमध्ये सापडलेल्या 'शिवलिंग'ची कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, संरचनेचे कोणतेही नुकसान होऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याचिकेवर राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता एमसी चतुर्वेदी आणि मुख्य स्थायी अधिवक्ता बिपीन बिहारी पांडे यांनी बाजू मांडली. हिंदूंच्या बाजूने हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन आणि ज्ञानवापी मशीदकडून एसएफए नक्वी यांनी बाजू मांडली. शिवलिंगाला इजा न करता कार्बन डेटिंग करता येईल का, अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकारचे वकील मनोज कुमार सिंग यांना केली होती. आता या चाचणीतून शिवलिंगाचे वय उघड होणार आहे.