उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. इमर्जन्सी ड्युटीवर असलेले डॉक्टर लाच दिल्याशिवाय रुग्णांवर उपचार करत नाहीत. रुग्णाला कितीही त्रास सहन करावा लागला आणि रक्त वाहत राहिले तरी डॉक्टर त्याच्यावर उपचार करत नाहीत. पायाला दुखापत झाल्यावर उपचार करण्याच्या नावाखाली इमर्जन्सी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने रुग्णाकडून 270 रुपये घेतले.
तरुणाने पैसे देईपर्यंत त्याला हातही लावला नाही. याच दरम्यान तरुणाच्या पायातून रक्त वाहत होतं. तो वेदनेने विव्हळत होता. तरुणाने या प्रकरणाची तक्रार सीएमएसकडे केली. मग कुठेतरी डॉक्टरांनी त्याचे पैसे परत केले. याप्रकरणी डॉक्टरांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर शहरातील गौरा देवी परिसरातील रहिवासी सागर यांचा मुलगा शुभ यादव याच्या पायाला लागल्याने खोल जखम झाली होती.
उपचारासाठी तो जिल्हा रूग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात पोहोचला, तेथे डॉ. ए. के. सिंह हे ड्युटीवर हजर होते. जखमी तरुणाने आपली व्यथा डॉक्टरांना सांगितल्यावर त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवण्यात आले. जिथे पायाला टाके घालण्यासाठी 270 रुपये मागितले होते. पैसे नव्हते म्हणून टाके घालण्यास नकार दिला. रक्तस्त्राव होत असल्याचे कारण देत रुग्णाने डॉक्टरकडे मोबाईल गहाण ठेवण्याची ऑफर दिली, मात्र तो मान्य झाला नाही.
270 रुपयांची व्यवस्था होईपर्यंत त्याला टाके घातले नव्हते आणि याच दरम्यान जखमेतून रक्त येत राहिले. डॉक्टरांच्या वागणुकीबाबत रुग्ण शुभने मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार केली. याप्रकरणी कारवाईचे आश्वासन देत डॉक्टरांनी रुग्णाला 270 रुपये परत केले. सीएमएस विनय प्रकाश यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. कारवाई केली जाईल. रुग्णांसोबत असे वर्तन योग्य नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.