उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका न्यायाधीशांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला इतर कोणी नसून वकिलाने केला आहे. न्यायाधीश न्यायालयातून बाहेर येत असताना एका वकिलाने त्यांची कार थांबवली. यानंतर न्यायाधीशांना कारमधून बाहेर काढले आणि गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकाने आणि चालकाने न्यायाधीशांची वकिलाच्या तावडीतून सुटका केली. न्यायाधीशांच्या तक्रारीवरून आरोपी वकिलाविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश सुदेश कुमार आपल्या कारमधून न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना गेट क्रमांक २ वर वकील रामदास सविता याने आपली दुचाकी त्यांच्या कारसमोर लावली. यावेळी न्यायाधीशांच्या कार चालकाने कार थांबवताच वकील रामदास सविता याने न्यायाधीश सुदेश कुमार यांना बाहेर काढले आणि मी तुम्हाला मारून टाकीन असे म्हणत त्यांचा गळा दाबण्यास सुरुवात केली. यावेळी वकिलाने गळा दाबल्याचे पाहून सुरक्षा रक्षक आणि शेजारी उभे असलेले लोक न्यायाधीशांकडे धावले आणि त्यांनी वकिलाच्या तावडीतून न्यायाधीशांची सुटका केली.
न्यायाधीश सुदेश कुमार यांनी हमीरपूर सदर कोतवाली येथे तक्रार पत्र देताना म्हटले आहे की, आरोपी वकील रामदास हा एसडीपीएसच्या एका प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्यांच्या अशिलावर सतत दबाव आणत होता. जामिनासाठी त्याने न्यायालयात बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले होते. बनावट प्रतिज्ञापत्र उघड झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा न्यायाधीशांनी दिला होता. यामुळे तो संतापला आणि आज संधी पाहून त्याने न्यायाधीशांची कार थांबवून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपी वकील रामदास सविता याने न्यायाधीश सुदेश कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळताच अॅडव्होकेट असोसिएशन हमीरपूरने त्याचे सदस्यत्व रद्द केले आहे. तसेच, न्यायाधीशांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून वकिलाला अटक करून कारागृहात पाठवण्यात येत आहे.