उत्तर प्रदेशच्या उन्नाव शहरात भीषण दुर्घटना घडली. मृतदेह घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला जोरदार धडक बसल्याने रुग्णावाहिकेतील चार जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तसेच, स्थानिक आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहून पोलिसांनीही मोठा फौजफाटा घटनास्थळी बोलवला होता. उन्नावच्या पुरवा-मौरवा मार्गावर ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली, ज्यामध्ये आई आणि तीन मुलींचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडिलांचे पार्थिव घेऊन जाताना ही ह्रदयद्रावक घटना घडली.
एका अज्ञात वाहनाने जोरधार धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील ४ जणांचा मृत्यू झाला. या रुग्णावाहिकेतून कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे शव नेण्यात येत होते. त्यातच, हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धडक देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे.
मौरावा येथील रहिवाशी धनीराम यांना पॅरालिसिसचा झटका आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कानपूरच्या एलएलआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे, एका खासगी रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव घरी नेण्यात येत होते. मात्र, दरम्यान, तुसरौर गावानजीक एका अज्ञान वाहनाने या रुग्णावाहिकेला जोराची धडक दिली. या भीषण दुर्घटनेतील रुग्णावाहिकेतील चारही जणांचा मृत्यू झालाय
धनीराम यांच्या पत्नी प्रेमा (७०), मुलगी मंजुला (४५), अंजली (४०) आणि रुबी (३०) या चारही जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत आईसह तीनही मुलांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी मोठा आक्रोश केला. तसेच, रुग्णावाहिकेला धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली.