उत्तर प्रदेशमधील बरेली येथे शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला असून, या अपघातात कारमधून प्रवास करत असलेल्या ८ जणांचा जळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बरेली-नैनीताल महामार्गावर शनिवारी रात्री ११ वाजता झाला. मारुती इर्टिगा कारचा टायर फुटून ती डिव्हायडर ओलांडून पलीकडून जाणाऱ्या डंपरला धडकली. अपघातानंतर कार लॉक झाली आणि तिला आग लागली. यात कारमधून प्रवास करत असलेल्या आठ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
अपघाताचे वृत्त समजल्यानंतर एसएसपी बरेली आणि आयजी बरेली रेंज डॉ. राकेश कुमार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांपैकी तीन जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारमधील प्रवासी हे एक लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. त्यावेळीच हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बरेलीचे एसएसपी सुशील चंद्रभान घुले यांनी सांगितले की, महामार्गावरील भोजीपुराजवळ कार ट्रकवर आदळून हा अपघात झाला. त्यानंतर कार फरफटत गेली आणि तिला आग लागली. तसेच अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवासी अडकून पडले आणि आगीमध्ये जळून त्यांचा मृत्यू झाला. प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील कारवाई सुरू आहे.