समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही होत असतात. आता दिवाळीदरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी माता लक्ष्मीबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. चार हात असलेली लक्ष्मी जन्माला कशी येऊ शकते? असा प्रश्न मौर्य यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
पूर्वी भाजपात आणि आता समाजवादी पक्षात असलेले स्वामी प्रसाद मौर्य हे हिंदू देवीदेवतांना सतत लक्ष्य करत असतात. दरम्यान,स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिवाळीदरम्यान पत्नीला टिळा लावतानाचा एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर शेअर केला आहे. त्याखाली त्यांनी माता लक्ष्मीबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे.
यात स्वामी प्रसाद मौर्य यांनी लिहिलंय की, संपूर्ण जगातील प्रत्येक धर्म, जात, वंश, रंग आणि देशात जन्माला येणारी मुलं ही दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे, एक डोकं अशा अवयवांसह जन्माला येतात. चार हात, आठ हात, दहा हात, वीस हात आणि हजार हात असलेलं मूल आतापर्यंत जन्माला आलेलं नाही. मग चार हात असलेली लक्ष्मी कशी काय जन्माला येऊ शकते. जर तुम्हाला लक्ष्मी देवीची पूजा करायची असेल तर तुच्या घरवालीची पूजा आणि सन्मान करा. ती खऱ्या अर्थाने देवी आहे. कारण ती तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण, सुख-समृद्धी, खाण-पिणं आणि देखभालीची जबाबदारी खूप निष्ठेने पार पाडते.