उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या विकासनगर परिसरामध्ये भर रस्त्यात मोठा खड्डा पडला. या खड्ड्यात तिथून जाणारी कार अडकली. नंतर ही कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली. पीडब्यूडीकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध एवढा मोठा खड्डा कसा काय पडला, याची माहिती देण्यात आली आहे.
पीडब्ल्यूडीच्या मते, रस्त्याखाली असलेल्या जल विभागाच्या ट्रंक सीवर लाइनमधून सातत्याने पाण्याची गळती होत होती. त्यामुळे रस्त्याखालून सातत्याने मातीची झीज होत होती. त्यामुळेच रस्त्याचा पाया नुकसानग्रस्त झाला आणि रस्ता खचला. याच्या दुरुस्तीसाठी पाणी विभागाच्या कार्यदायी संस्थेला घटनास्थळी बोलावण्यात आले.
लोक निर्माण विभागाने सांगितले की, ३ मार्च रोजी गुलाचीन मंदिरापासून शिवमंदिर येथून लेबर अड्ड्यातकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक ७ मीटर लांब, ५ मीटर रुंद आणि ५ मीटर खोल एवढा मोठा खड्डा तयार झाला. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करावा लागला.
याबाबत इंजिनियर्सनी तत्काळ दखल घेतली आणि घटनास्थळाचं निरीक्षण केलं. त्यात दिसून आलं की, रस्त्याच्या पृष्टभागाखाली असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या ट्रंक सीवर लाइनमधून सातत्याने पाण्याची गळती होत होती. त्यामुळे माती खचली आणि रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी पुरवठा विभागाच्या ठेकेदार कंपनीने पाईपमधून होणाऱ्या गळतीची दुरुस्ती करण्याचं काम सुरू केलं आहे. या दुरुस्तीचं काम केल्यानंतर रस्त्याचं काम केलं जाणार आहे.