पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या यशाचा मोठा वाटा होता. मात्र यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची अनपेक्षितरीत्या पीछेहाट झाली. तसेच लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये केवळ ३३ जागाच जिंकता आल्याने भाजपाला लोकसभेत बहुमत मिळवण्यात अपयश आले. उत्तर प्रदेशमधील निकालांमुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपाच्या या सुमार कामगिरीबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपाच्या कार्यसमितीच्या बैठकीत आपलं मत मांडलं आहे. आम्हाला अतिआत्मविश्वासामुळे पराभवाचा सामना करावा लागला, तसेच यापुढे अशी चूक करू नका, असा सल्ला योगींनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, जेव्हा आपण अतिआत्मविश्वासामध्ये असतो. जेव्हा जिंकत असतो. तेव्हा स्वाभाविकपणे कुठे ना कुठे फटका बसतो. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या स्थितीत बॅकफूटवर येण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने केलं आहे. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षांमध्ये होता, तेव्हा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी संघर्ष करत होता. आता उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार आहे. तेव्हा तुम्हाला सुरक्षित वातावरण दिसत आहे.
योगी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये १० जागांवर होऊ घातलेली विधानसभेची पोटनिवडणूक आणि २०२७ च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी सक्रिय राहिलं पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांसह, आमदार, विधान परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, ब्लॉक प्रमुख, नगरसेवक या सर्वांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली पाहिजे. आपल्याला पुन्हा एकदा राज्यात भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे, असे योगी यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ३३ तर भाजपाच्या मित्र पक्षांना ३ जागा मिळाल्या होत्या. तर समाजवादी पक्षाने ३७ आणि काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला होता. एक जागा अपक्षाने जिंकली होती. मागच्या दहा वर्षांपासून उत्तर प्रदेशात एकतर्फी वर्चस्व राखणाऱ्या भाजपासाठी हा एक मोठा धक्का होता.