बरेली - नोकरी गेल्यामुळे आत्महत्या केलेल्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्याच्या पत्नीने बरेली विभागाचे आरएस दीपक चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या पतीला नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर चौकशीसाठी कार्यालयात दररोज बोलावण्यात येत होते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्यांची बाजू ऐकूनच घेतली जात नव्हती. अधिकारी वर्गाच्या या जाचाला कंटाळूनच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचं मोहित यादव यांच्या पीडित पत्नी रिंकी यांनी म्हटलंय
उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस थांबवून बसमधील प्रवाशांना नमाज पठण करण्यास मुभा दिल्यामुळे बसचे वाहक मोहित यादव यांचे निलंबन करण्यात आले होते. नोकरी गेल्याचं दु:ख आणि अधिकारी वर्गाकडून होणाऱ्या पिळवणुकीमुळेच मोहित यादव यांनी आत्महत्या केल्याचं त्यांची पत्नी रिंकी यांनी म्हटलं आहे. रिंकी यांनी बरेली विभागाचे आरएम दीपक चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आरएमकडून माझ्या पतीला दररोज कार्यालयात बोलावण्यात येत होते. मात्र, त्यांची बाजू ऐकूनच घेतली जात नव्हती. त्यांची बाजू न ऐकताच त्यांना नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळेच, अचानक नोकरी गेल्याने पतीने आत्महत्या केल्याचं रिंकी यांनी म्हटलं आहे. माझ्या पतीने माणुसकीची किंमत चुकवली, असे म्हणत रिंकी यांनी प्रशानातील अधिकाऱ्यांविरुद्ध आपली भूमिका मांडली. मैनपुरीच्या घिरोर तालुक्यातील नगला गावचे रहिवाशी असलेल्या मोहित यादव हे बरेली डेपोमध्ये कंत्राटी पद्धतीने वाहक म्हणून नोकरीवर होते.