उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बांदा येथे परतत असताना एका 25 वर्षीय तरुणाचा ट्रेनमध्ये अचानक मृत्यू झाला. मात्र, याची माहिती नसल्याने त्याच्या गरोदर पत्नीसह नातेवाईक तरुणाच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मृत्यूची माहिती समजताच घरात शोककळा पसरली. गर्भवती पत्नीला मोठा धक्का बसला आहे.
नातेवाईकांनी त्याला ट्रेनमध्ये विषबाधा झाली आणि त्याची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे. माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी मृतदेह रेल्वेतून खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. सूरज भान हा तरुण अहमदाबादमध्ये राहत असताना मजूर म्हणून काम करायचा. त्याचं कुटुंब बांदा येथे राहतं. रविवारी तो बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेसने घरी परतत होता.
महोबा स्टेशनजवळ अचानक त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. शेजारी बसलेल्या प्रवाशांनी जीआरपी पोलिसांसह रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. मात्र त्याची प्रकृती सतत खालावत चालली होती. माहितीच्या आधारे, जीआरपी पोलिसांनी त्याला रेल्वे डॉक्टरांकडे नेले जेथे त्यांनी सूरजला मृत घोषित केले. मृताच्या खिशातून पोलिसांना अहमदाबाद ते बांदा रेल्वेचे तिकीट सापडले. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सूरजच्या दोन मुलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी गरोदर आहे. काही दिवसांनी प्रसूती होणार होती, त्यामुळे तो अहमदाबादहून घरी परतत होता. सुरजला वाटेत कोणीतरी विष दिलं असावं, त्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि घरी पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पत्नी सहा महिन्यांनी पती घरी येण्याची वाट पाहत होती. घरात आनंदाचे वातावरण होते, मात्र अचानक पोलिसांच्या फोननंतर सर्वांना धक्का बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.