उत्तर प्रदेशमधील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करवून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या शिक्षिकेवर आणि शाळेवर कारवाई करण्याची मागणी होत असून, सरकारकडूनही तशी पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, त्या विद्यार्थ्याला मारायला लावणाऱ्या शिक्षिकेने प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. मात्र जे घडलं त्याबाबत त्यांनी वेगळाच दावा केला आहे.
ही शिक्षिका प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, मुलांना वळण लावण्यासाठी थोडीफार शिक्षा करावीच लागते. मी या गावामध्ये बऱ्याच काळापासून शिक्षण देण्याचं काम करत आहे. आजपर्यंत असं काही घडलं नव्हतं. असं पहिल्यांदाच घडलं आहे. त्या दिवशी त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तो अभ्यास करत नाही. त्याच्याकडे जरा लक्ष द्या असं सांगितलं होतं. मी अपंग आहे. उठून शिक्षा करू शकत नाही. त्यामुळे मी एका विद्यार्थ्याला सांगितलं की, याला शिक्षा कर. मी एकालाच सांगितलं मात्र दोन तीन विद्यार्थ्यांनी मिळूत त्याला मारले. तेव्हा मी त्याच्या कानशिलात मारू नका म्हणून सांगितलं.
त्यावेळी तिथे एक जण बसून व्हिडीओ बनवत होता. तो त्या मुलाचा काका होता. त्याने सांगितलं की हळू का मारताय जोरात मारा, तेव्हा मी जोरात मारायला सांगितलं. तसंच मी मुस्लीम हा शब्द उच्चारला नव्हता. मी मुस्लिम समाजातील मातांनी मुलांना माहेरी नेऊ नये, कारण त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होतंय, असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी मुस्लिम शब्द ठेवून व्हिडीओतला बाकी आवाज कट केला, असा दावा या शिक्षिकेने केला.
ती पुढे म्हणाली की, तो विद्यार्थी मुस्लिम होता. म्हणून त्याला मारण्याचा माझा हेतू नव्हता. मुलांमध्ये शिक्षकाने असा भेदभाव केला तर कुठली शाळा चालणार नाही, तसेच असं जर नेहमी घडलं असतं तर पालकांनी या शाळेतून मुलांचा दाखला काढून नेला असता, कारण या शाळेत मुस्लीम मुलांची संख्या जास्त आहे.