वाराणसी : सनातन रक्षक दल या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काही मंदिरांतील साईबाबा यांच्या मूर्ती मंगळवारी हटविण्यात आल्या. या संघटनेने बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती तिथून हलवून मंदिराबाहेर आणून ठेवली.
बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी रामू गुरू यांनी सांगितले की, योग्य माहिती नसल्याने साईबाबांच्या मूर्तीची पूजा करण्यात येत होती. ही कृती शास्त्रसंमत नाही. अयोध्येच्या हनुमानगढी मंदिराचे महंत राजू दास यांनी सांगितले की, साईबाबा हे धर्मगुरू, महापुरुष, पीर, अवलिया होऊ शकतात; पण ते देव, ईश्वर असू शकत नाहीत. त्यामुळे वाराणसीच्या मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटविणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सनातनी मंडळींनी सर्व मंदिरातून चांदपीर (साईबाबा) यांच्या मूर्ती हटविल्या पाहिजेत, असे मी आवाहन करतो. सनातन दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की, काशी म्हणजे वाराणसीमध्ये फक्त भगवान शंकर या सर्वोच्च देवतेचीच पूजा व्हायला हवी. (वृत्तसंस्था)
भक्तांच्या भावनांचा आदर करून वाराणसीतील दहा मंदिरांतून साईबाबा यांच्या मूर्ती हटविण्यात आल्या. येत्या काही दिवसांत अगस्त्यकुंड, भुतेश्वर मंदिरातील साईबाबा मूर्तीही तिथून हलविण्यात येतील, असे सनातन रक्षक दलाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले.
‘साईबाबा मूर्ती हटविणे ही अयोग्य कृती’ वाराणसी येथील संत रघुवरदास नगर येथील साईबाबा मंदिराचे पुजारी समर घोष यांनी सांगितले की, स्वत:ला आता सनातनी म्हणवून घेणाऱ्या लोकांनीच पूर्वी मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्तींची स्थापना केली होती. आता तेच या मूर्ती हटविण्याचे काम करत आहेत. देव कोणत्याही रूपात दिसू शकतो. त्यामुळे साईबाबांच्या मूर्ती मंदिरांतून हटविणे ही चुकीची कृती आहे. त्यामुळे समाजातील असंख्य भाविकांच्या भावना दुखावतात.