लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लवकरच उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. या निवडणुकीत पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपस्थित बहुतांश नेत्यांनी वरुण यांचे तिकीट कापण्याची मागणी केली होती. यासाठी वरुण सातत्याने पक्षाविरोधात बोलत असल्याचे कारण देण्यात आल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापले तरी, ते निवडणूक लढवतील, यासाठी त्यांचा B प्लॅन तयार असल्याची चर्चाही माध्यमांमध्ये सुरू आहे.
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना भाजपने तिकीट दिले नाही तर, ते अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढतील. यासाठी त्यांनी संपूर्ण तयारीही केली आहे. ते 2019 च्या निवडणुकीत पिलीभीतमधून तिसऱ्यंदा खासदार बनले होते. त्यांच्या प्रतिनिधीने दिल्लीवरून पिलीभीतला जाऊन नॉमिनेशन पेपरचे चार सेट घेतले आणि नंतर दिल्लीला परतले. यामुळे भाजपने तिकीट दिले नाही, तर ते अपक्ष निवडणूक लढू शकतात, असे मानले जात आहे.
सूत्रांच्या मते, यावेळी भाजप वरुण गांधी यांचे तिकीट कापून पिलीभीतमधून योगी सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद यांनाही उभे करू शकतो. याशिवाय, संजय गंगवार यांचेही नाव चर्चेत आहे. वरुण गांधी यांची गणना कधी काळी भाजपच्या फायरब्रँड नत्यांमध्ये केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वरुण आपल्याच राज्य आणि केंद्र सरकार विरोधात बोलत आहेत. शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारीसारख्या अनेक मुद्द्यांवर वरून यांनी उघड उघड भाष्य केले आहे.