सरकारी खात्यातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका दाखवून ३१ वर्षे नोकरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका सरकारी खात्यात हा कर्मचारी कार्यरत होता. संबंधित कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रे दाखवून सरकारी नोकरीचा लाभ घेतला. बनावट मार्कशीटच्या आधारे हा कर्मचारी ३१ वर्षे वाहतूक विभागात कार्यरत होता. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याने बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले. तब्बल ३१ वर्षे वाहतूक विभागात चालक म्हणून काम केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दीपक टंडन नावाच्या व्यक्तीने सुधीर कुमार याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर कुमार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी वाहतूक विभागातून निवृत्त झाला. न्यायालयाने कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ड्रायव्हिंग लायसन्सच्या अटी अन् पर्दाफाश तक्रारदार दीपक टंडन यांनी सांगितले की, सुधीर कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मुझफ्फरनगरमधील खतौली डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत होता, जो ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सेवानिवृत्त झाला. तो बनावट कागदपत्रांवर एवढी वर्षे नोकरी करत होता. १९८९ मध्ये त्याने नोकरी करायला सुरूवात केली तेव्हाच त्याने ड्रायव्हिंग लायसन्सच्या अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्याची खरी जन्मतारीख १५ ऑगस्ट १९६५ ही आहे. तर, खोट्या कागदपत्रांमध्ये १५ ऑगस्ट १९६१ अशी दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रारदाराने सार्वजनिक माहितीच्या आधारे सिसौली येथील जनता इंटर कॉलेजमधून सुधीर कुमारचे शैक्षणिक रेकॉर्ड मिळवले. तेथील मुख्याध्यापकांनी सांगितले की, आरोपीची जन्मतारीख शाळेच्या रेकॉर्डमध्ये १५ ऑगस्ट १९६५ अशी आहे, याच शाळेत आरोपीने पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. अशा प्रकारे तो बनावट गुणपत्रिकेच्या मदतीने सरकारी नोकरी करत होता.