लखनौ - भारतातून कोरोना हद्दपार झाला, आता कोरोनाची भीती नाही, अशीच धारणा सर्व भारतीयांच्या मनात बनली आहे. त्यामुळे, अनेक लॉकडाऊनचे अनलॉक झाल्यानंतर देश पुन्हा सुरू झाला असून सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम सभा, रॅली सर्वकाही पुन्हा सुरळीतपणे सुरू झाल्याने देशवासीयांचं नॉर्मल जगणं सुरू आहे. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.१ बद्दल सध्या नागरिकांमध्ये भीती आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी ह्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन गाईडलाईन जारी केली आहे.
देशात आणि जगात लोक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहेत याच दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.१ बद्दल सध्या नागरिकांमध्ये घबराट आहे. २१ डिसेंबरपर्यंत देशभरात नवीन व्हेरिएंटची एकूण २२ प्रकरणे समोर आली असून, सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्याची बाब दिलासादायक आहे. याला चौथी लाट म्हणायची गरज नाही. दोन-तीन आठवड्यांत हे सर्व काही सामान्य स्तरावर येईल असे तज्ज्ञांचे म्हणणे असून JN.1 मुळे कोणतीही लाट येण्याची शक्यता नाही असेही वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जाणकारांचे मत आहे. मात्र, सतर्कता आणि काळजीपूर्वक खबरदारी म्हणून उत्तर प्रदेशातील योगी सरकारने गाईडलाईन जारी केली असून खोकला, ताप आणि श्वसनाचे त्रास होणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नाताळ आणि न्यू-ईयरच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. योगी सरकारने राज्यातील सर्वच सरकारी आणि खासगी रुग्णालये, तसेच सीएमओलाही गाईडलाईन पाळण्याचे आदेश दिले आहेत. ताप, खोकला आणि श्वसनाच्या रुग्णांची कोविड तपासणी करुन घ्यावी, कोविड चाचणी पॉझिटीव्ह आढळल्यास जीनोम सीक्वेंसिंगसाठी त्यांचे सँपल केजीएमयूला पाठवण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. अशा रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेऊन जोपर्यंत त्यांचा अहवाल निगेटीव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर विलगीकरणातच उपचार करण्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, नोएडानंतर आता राजधानी लखनौमध्येही नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला आहे. येथील कोरोना संक्रमित महिला थायलंडहून आली होती. सध्या त्या महिलेला तिच्याच घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. लखनौच्या मानकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदरनगर येथील ही घटना आहे.
घाबरण्याची गरज नाही!
कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरिएंटने नक्कीच चिंता वाढवली आहे. पण, घाबरण्याची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याचे 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केले आहे. हा शेवटचा प्रकार नाही. भारतात JN.1 ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ.गौतम भन्साळी म्हणाले की, या आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप यांचा समावेश आहे. पण, परिणाम खूपच कमी असेल. मला वाटत नाही की याने कोणतीही लाट येईल. मुंबईत दहा प्रकरणे आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर थोडीफार वाढ होऊ शकते. लस आणि बूस्टर डोसनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ओमिक्रॉन वेव्हने संपूर्ण जगाला त्रास दिला होता. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मोठ्या संख्येने लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे लाट येणार नाही.