बदायू - मृत्यू कधी, कुणाला, कसा येईल काही सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील बदायू येथे घडलेल्या घटनेमुळे हेच पुन्हा एकदा सिद्ध होते. याठिकाणी आजारामुळे मोठ्या भावाचा मृत्यू झाला, त्याच्या निधनामुळे दु:खात असलेला छोटा भाऊ पिंपळाच्या झाडाखाली बसून रडत होता. मात्र तितक्यात झाडाची फांदी छोट्या भावावर कोसळली आणि या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी २ भावांच्या मृत्यूनं कुटुंबाला मोठा धक्का बसला. गावातही भयाण शांतता पसरली.
बदायू इथल्या गभियाई नगला गावातील ही दुर्घटना आहे. याठिकाणी रामसिंह यांचा मोठा भाऊ अनोखे लाल यांचं दिर्घ आजारामुळे निधन झालं. त्यानंतर कुटुंब, नातेवाईक आणि गावकरी अनोखे लाल यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. कुटुंबाने ज्याठिकाणी मृतदेह ठेवला होता तिथेच एक महाकाय पिंपळाचं झाड होते. मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेला छोटा भाऊ रामसिंह हे त्या झाडाखाली उभे होते. त्यावेळी अचानक पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. यात रामसिंह यांचा तिथेच जीव गेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी रामसिंह यांचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. मात्र एकाच कुटुंबातील या दोन भावांचा जीव गेल्यानं गावकरीही हळहळले. या दोन्ही भावांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे रडणाऱ्या रामसिंहला त्याच्यावरच मृत्यूचं सावट आहे याची कल्पनाही नसावी. पिंपळाच्या झाडावरील फांदीमुळे रामसिंहचा जीव गेला.