उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरादाबाद रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्मवर दोन चिमुकल्या मुलांचे वडील मृतावस्थेत आढळले. दोन निरागस मुलं त्याच्या मृतदेहाजवळ बसली होती आणि वडिलांच्या मृतदेहाकडे एकटक बघत होती. पप्पांची तब्येत बिघडली होती, त्यांना ताप येत होता. आम्ही औषधे आणण्यासाठी दिल्लीला जात होतो, वडील मुरादाबाद स्टेशनवर ट्रेनमधून उतरले आणि खाली पडले अशी माहिती एका मुलाने दिली आहे.
सोनू (45) असं या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांचा चार वर्षांचा मुलगा चेतन याने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. मुरादाबाद रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म दोनवर सोनू हे मृतावस्थेत आढळले. दोन निरागस मुलं त्याच्या मृतदेहाजवळ उभी होती. रेल्वे चाइल्डलाइनच्या समुपदेशकांनी मुलांची खूप काळजी घेतली पण ते बोलायला तयार नाहीत. एक मुलगा सुमारे तीन वर्षांचा आहे, तर दुसरा मुलगा चार वर्षांचा आहे.
मुलांची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीसमोर हजर केल्यानंतर त्यांना निवारागृहात ठेवण्यात आले आहे. सोनूचा मोठा मुलगा समुपदेशकांशी बोलला. त्याने अडखळत आपले नाव चेतन असल्याचं सांगितलं, तर त्याच्या धाकट्या भावाचे नाव अन्नी असल्याचे सांगितले. मुलाने सांगितले की, तो अलीगडचा रहिवासी आहे. लहान असल्याने त्याला घरचा पूर्ण पत्ता सांगता आला नाही. वडिलांसोबत औषध घेण्यासाठी ट्रेनने दिल्लीला जात होतो असं म्हटलं आहे.
मुरादाबाद स्टेशनवर उतरल्यानंतर काही अंतर चालल्यानंतर मुलांचे वडील खाली पडले. मुलाने दुःखाने सांगितले की, यानंतर वडील उठले नाहीत. प्लॅटफॉर्मवर मृतावस्थेत सापडलेल्या सोनू यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. यामध्ये फुफ्फुसातील गंभीर संसर्ग आणि टीबीमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जीआरपीचे निरीक्षक सुधीर कुमार यांनी सांगितले की, मृत व्यक्तीकडे औषधाचा कागद सापडला आहे. त्यात सरकारी रुग्णालय अलीगडचा पत्ताही होता. त्याच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवर अजमेरी गेट नवी दिल्लीचा पत्ता लिहिलेला आहे. मुलांनी सांगितले की त्यांचे वडील मजूर म्हणून काम करायचे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.