लखीमपूर खीरीच्या मैलानी कंधईपूर येथील प्रकरण दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना आपलं गाऱ्हाणं सांगण्यासाठी येथील महिला ट्रेनमधून लखनौकडे निघाल्या होत्या. मात्र, लखनौकडे जाणाऱ्या ४० महिला-पुरुषांना पोलिसांनी अडवले. गोला स्टेशनवर पोलिसांनी जबरदस्तीने या महिलांना खाली उतरवून घरी पाठवले. रेल्वे स्टेशनवर अचानक पोलीस फोर्स पाहून एकच गोंधळ पाहायला मिळाला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत एसपी यांनी मैलानी एसओ राहुल सिंह यांना बोलावून घेतले.
कंधईपूर येथील युवक बृजेश पासी याचा मृतदेह १० मे रोजी गावातील आरख बिरादरीच्या एका व्यक्तीच्या घरातच आढळून आला. त्यामुळे, पासी आणि आरख बिरादरीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. १२ जून रोजी दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर, घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी लाठी-काठी उगारत गाववाल्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याप्रकरणी, ४८ पेक्षा अधिक लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आपल्यावरील अन्याय मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी कंधईपूर येथील ५ पुरुष आणि ३० महिला लखनौकडे निघाल्या होत्या. मात्र, ज्या रेल्वेमधून ते सर्वजण प्रवास करत होते, त्यांच्या रेल्वेपूर्वीच गोला रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या. सीओ राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्त्वात पोलिसांचा फौजफाटा येथे पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. रेल्वे परिसराला प्रत्यक्षात छावणीचं स्वरुप प्राप्त झालं.
पोलिसांनी रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या कंधईपूर गावातील प्रवाशांना बाहेर काढलं. पोलिसांनी जबरदस्ती करत या महिलांना ट्रेनमधून खाली उतरवले, त्यापैकी काही महिलांच्या कुशीत लहान मुलेही होती. या स्टेशनवरुन रेल्वे पुढे रवाना झाल्यानंतर पोलिसांनी कंधईपूर गावात या सर्वच प्रवाशांना दोन टाटा मॅजिक गाडीतून घरी पाठवलं. विशेष म्हणजे या रेल्वेतून मैलानी गावचे काही प्रवासी खासगी कामानिमित्त जात होते, आपल्या नातेवाईकांकडे जात असताना त्यांनाही गाडीतून जबरदस्तीने खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी असंवेदनशीलपणे वर्तणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. रेल्वेतील काही प्रवाशांना नाहक पोलिसांचा त्रास सहन करावा लागला.