अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मोठा उत्साह असून सर्वत्र जय्यत तयारी आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं असून मंदिर उभारणीत योगदान देणाऱ्यांनाही आवर्जून निमंत्रण दिले जात आहे. राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याने ते भावूकही होत आहेत. अक्षत निमंत्रण मिळाल्यानंतर आपण भाग्यवान असल्याचं रामभक्त सांगत आहेत. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील मोहम्मद हबीब यांनाही अक्षत निमंत्रण देण्यात आलं आहे. मोहम्मद हबीब हे १९९२ च्या राम मंदिर उभारणीचं स्वप्न पाहणाऱ्यांपैकी एक आहेत.
मिर्झापूरच्या जमालपूर ब्लॉकमधील जफराबाद येथील रहिवाशी असलेल्या मोहम्मद हबीब यांनाही संघ कार्यकर्त्यांकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षत निमंत्रण देण्यात आलं आहे. सन १९९२ साली राम मंदिर उभारणीचं स्वप्न हबीब यांनी पाहिलं होतं, त्यासाठी त्यांनीही कारसेवा केला होती. १९९२ मध्ये ते अयोध्येला कारसेवक म्हणून पोहोचले होते. त्यामुळे, आज तब्बल ३० वर्षानंतर हे मंदिर उभारणीचं स्वप्न पूर्ण होत असल्याने ते भावूक झाले.
अक्षत निमंत्रण घेऊन मोहम्मद हबीब यांच्या घरी पोहोचलेल्या संघ कार्यकर्त्यांना पाहून हबीब भावूक झाले होते. हबीब हे २ डिसेंबर १९९२ रोजी वाराणसी कैटमधील ५० कारसेवकांसोबत अयोध्येला गेले होते. त्यावेळी, ते भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. अक्षत निमंत्रणावेळी त्यांनी ३० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
५० लोकांच्या ग्रुपने आम्ही २ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी, ४ ते ५ दिवस आम्ही अयोध्येत राहिलो. विहिंपचे अशोक सिंघल आणि बजरंग दलाचे विनय कटियार यांचे भाषणही ऐकलं होतं. त्यानंतर, शरयू नदीच्या किनाऱ्यावर जाऊन स्नान करुन तेथील वाळूही आम्ही घेऊन आलो होतो. आमच्यासमोर पाडलेला ढाचा, समतल बनला होता. त्यानंतरच, आम्हाल परत फिरण्याचे आदेश देण्यात आले होते. आज हे निमंत्रण मिळाल्याने मी भावूक झालोय, अशी आठवण मोहम्मद हबीब यांनी सांगितली.