आगामी लोकसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक राहिले असून पुढील ३ ते ३ महिन्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून संभाव्य इच्छुक उमेदवारही तयारी करत आहेत. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ८० सदस्या लोकसभेत निवडून जातात. याच उत्तर प्रदेशातील बक्सरलोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ते, भारती पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत.
आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत. क्रिसमसची सुट्टी संपताच त्यांनी १६ जानेवारी २०२४ पासून आपला राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी स्वेच्छानिवृत्ती पत्रात आसाम सरकारकडे केली आहे. आसामच्या मुख्य सचिवांकडे त्यांनी राजीनामापत्र दिले आहे. सध्या ते आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. आनंद मिश्रा हे मूळचे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील पडसौरा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण व सांभाळ कोलकाता येथे झाले. आसाममधील डॅशिंग आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. येथील नगांव जिल्ह्यात त्यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली होती. विशेष म्हणजे भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. आपलं खासगी आयुष्य आणि सामाजिक कार्यातील ओढ यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
मिश्रा यांच्या वडिलांचे मूळ गाव हे बक्सर जिल्ह्यात असून गत लोकसभा निवडणुकीत ते बक्सर लोकसभा मतदारसंघाचा हिस्सा राहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयपीएस आनंद मिश्रा यांनी बक्सर जिल्ह्यात आपला सक्रीय सहभाग दर्शवल्याचंही पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक प्रभावशाली व्यक्तींसोबत त्यांचा संपर्क वाढला असून कार्यक्रमातही सहभागी होत आहेत. मणिपूर येथील हिंसाचाराच्या चौकशीसाठी न्यायालयाने गठित केलेल्या विशेष समितीचे ते प्रमुख आहेत. त्यामुळेच, बस्कर लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या सहभागावर आणि सार्वजनिक भेटीगाठींवर काही प्रमाणात अंकुश आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बक्सर हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ असून येथील गत ७ लोकसभा निवडणुकांपैकी ६ वेळा ब्राह्मण उमेदवारच विजयी झाला आहे, तेही भाजपाच्या कमळ चिन्हावर. सध्या येथून भाजपा नेते अश्विनी चौबे खासदार आहेत. त्यांच्या अगोदर भाजपाच्या लाल मुनी चौबे यांनी ४ वेळा येथून संसदेत लोकप्रतिनिधीत्व केलं आहे.