रायबरेली : गेल्या दशकातील राजकारण हे जबाबदारीचे नव्हते. निष्क्रिय सत्ताधारी धर्माच्या नावावर मते मागत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी भाजपवर केली.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना प्रियांका म्हणाल्या की, धर्माच्या नावावर तुमची फसवणूक करून आणि तुमच्याकडून देवाच्या नावाने मत देण्याचे वचन घेऊन ते सत्तेवर येऊ शकतात हे भाजप नेत्यांना कळले आहे. देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. एक म्हणजे सत्य, मतदारांप्रती समर्पण आणि त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छाशक्ती असलेले आणि दुसरे म्हणजे भाजपचे राजकारण ज्यामध्ये ते तुमच्या भावनांचा वापर करून मते घेतात, असेही त्या म्हणाल्या.
रायबरेलीत भाजपचे उमेदवार मतांसाठी सरपंचांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. रायबरेलीत भाजपचे दिनेश प्रताप सिंह हे राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.