उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील कोताना गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दफनभूमीत दफन केलेले मृतदेह बाहेर काढून तांत्रिक कृत्यं करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, चार कबरी खोदून मृतदेह बाहेर काढून तांत्रिक कृत्य करण्यात आली. आता येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत असून, पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून दफनभूमीमध्ये लाठ्या काठ्या घेऊन पहारा दिला जात आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, जेव्हा पहिल्यांदा हा प्रकार घडला होता तेव्हा कुठल्या तरी जनावराने हे कृत्य केले असावे असे वाटले. मात्र नंतर एकापाठोपाठ एक अशा चार कबरी खोदण्यात आल्या. तसेच तिथे खोदकामासाठी फावड्याचा वापर झाल्याच्या खुणा आढळल्या. त्यामुळे या कबरी माणसांनीच खोदल्याची शक्यता वाढली. दरम्यान, ग्रामस्थांनी बडौत पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळी येत तपास सुरू केला आहे.
ही घटना बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. इथे दफनभूमीत मृतदेह पुरण्यात आलेल्या कबरी खोदलेल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह बाहेर काढून त्यांच्यासोबत तंत्रविद्या करण्यात आल्याचा आरोप गावातील मुस्लिम समाजाने केला आहे. तसेच ग्रामस्थांनी गावातील स्मशानभूमीत पहारा देण्यास सुरुवात केली आहे. तसेच हे मृतदेह कुठल्या प्राण्याने बाहेर काढले की, हे कृत्य कुठल्या माणसाने केले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.