ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सहजच घडतानाचे चित्र दिसून येते. मेट्रोमोनियल साइटवरुनही फसवणुकीच्या घटना घडल्याचे काही उदाहारणं आहेत. मात्र, चक्क एका महिला पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं आहे. आपण, २००८ च्या युपीएससी बॅचचा पासआऊट असून आयआरएस अधिकारी असल्याचे सांगत एकाने चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक केली आहे. रांची येथील एका आयआरएस अधिकाऱ्याच्या नावाशी साधर्म्य असल्याचा फायदा घेत ही फसवणूक करण्यात आली होती.
कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी व लेडी सिंघम म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो, त्या डेप्युटी एसपी श्रेष्ठा ठाकूर यांनाच फसवणुकीचा सामना करावा लागला. ज्या व्यक्तीस आयआरएस अधिकारी समजून श्रेष्ठा यांनी लग्न जमवले, तो ठग निघाला. श्रेष्ठा यांनी मेट्रोमेनियल साईटवरुन रोहित राज नावाच्या व्यक्तीची भेट घेतली. त्यावेळी, आपण २००८ च्या बॅचचा आयआरएस अधिकारी असल्याचं त्यांने सांगितलं. तसेच, सध्या रांची येथे आपली पोस्टींग आहे, असा दावाही केला होता. महिला पोलीस अधिकारी श्रेष्ठा यांनी यासंदर्भात व्हेरीफाय करण्यासाठी रांची येथे चौकशी केली असता, त्याच नावाचे अधिकारी रांचीमध्ये होते, त्यांच्या नावाचा वापर करुन या ठगाने फसवणूक केल्याचं उघड झालं.
कानपूरच्या रहिवासी असलेल्या श्रेष्ठा ठाकूर युपीतील लेडी सिंघम अधिकारी म्हणून पोलीस खात्यात प्रसिद्ध आहेत. लहानपणी गुंडाकडून त्यांची छेडछाड करण्यात आली होती. तर, कॉलेजमध्येही त्यांनी असे अनुभव पाहिल्यामुळे आपण आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगत त्यांनी ते पूर्णही केलं. सन २०१२ साली युपीएससी परीक्षा पास होऊन त्या डीएसपी बनल्या.
नोकरीच्या ६ वर्षानंतर श्रेष्ठा ठाकूर यांनी आयआरएस अधिकारी समजून रोहित राज यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, रोहितच्या वागण्यातून त्याचा पर्दाफाश झाला अन् सत्य समोर आलं. पण, श्रेष्ठा यांनी झालेलं लग्न मानून घेत गप्प राहणं पसंत केलं. मात्र, पत्नी श्रेष्ठा यांच्या नावाने धमकी देऊन रोहित हा लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी अधिकारी ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर, श्रेष्ठा यांनी २ वर्षानंतर रोहित राज यास घटस्फोट दिला. दरम्यान, गाझियाबाद येथील कौशांबी पोलीस ठाण्यात श्रेष्ठा यांनी त्यांच्या घटस्फोटीत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, रोहित राज यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.