उत्तर प्रदेशच्या झाशी येथील मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत नवरदेवाच्या अनुपस्थितीत नवरीने थेट आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत सप्तपदी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची पोलखोल होताच नववधूने घाईघाईत तिला लावण्यात आलेलं कुंकू पुसलं. याबाबत समाजकल्याण अधिकारी ललिता यादव सांगतात की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली असून, चौकशी केली जाईल.
हे संपूर्ण प्रकरण झाशीच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानात घडले आहे. येथे सामूहिक विवाह योजनेंतर्गत अनेक जोडप्यांचं लग्न झालं. मात्र याच दरम्यान एक नवरदेव घटनास्थळी न पोहोचल्याने वधूने आपल्यासोबत आलेल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत लग्न केलं आहे. वधू-वरांशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी हे मान्य केलं आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी दूरदूरवरून अनेक वधू-वर आले होते. त्यानंतर एका जोडप्याकडे पाहिलं असता हे प्रकरण संशयास्पद वाटलं. त्यानंतर सत्य समोर आलं. झाशी येथील रहिवासी असलेल्या खुशीचं लग्न मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बृषभानसोबत ठरलं होतं आणि सामूहिक विवाह सोहळ्यातील तिचा नोंदणी क्रमांक 36 होता. पण तिचं लग्न बृषभानऐवजी दिनेश सोबत झालं.
दिनेशने सांगितलं की, बृषभानसोबत लग्न होणार होतं, पण तो आला नाही, म्हणून विभागातील काही लोकांच्या सांगण्यावरून तो नवरदेवाच्या जागी बसला. दिनेश आधीच विवाहित आहे आणि तो खुशीच्या बहिणीचा नवरा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने विवाह सोहळ्यात दिलेली आर्थिक मदत मिळवण्यासाठी हे असं करण्यात आलं आहे. याआधी देखील अशी घटना समोर आली आहे.