युपी - रामपूर पोलिसांनी हनीट्रॅपप्रकरणी फरार असलेल्या महिला गँगस्टारला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना यापूर्वीच तुरुंगात टाकलं होतं. तर, महिला गँगस्टर जोहरा हिच्यावरही गँगस्टर कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे. मोबाईवरुन अश्लील व्हिडिओ कॉल करुन लोकांची फसवणूक करणे आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी जोहराविरुद्ध पोलीस कारवाई सुरू आहे.
गँगस्टर जोहरा उर्फ महकला पोलिसांनी अटक केली असून गेल्या वर्षभरापासून पोलीस या गँगस्टर महिलेचा शोध घेत होते. गंज पोलीस ठाण्यात जोहराविरुद्ध अश्लील कॉलद्वारे फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगची फिर्याद देण्यात आली होती. एका पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर ६ ऑगस्ट २०२२ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते.
याप्रकरणी पोलीस तपासात एका महिलेसह ५ जणांची नावे समोर आली होती. पोलिसांनी ५ जणांचा शोध घेऊन त्यांना कोठडीत टाकले होते. मात्र, याप्रकरणी शुतुरखान येथील रहिवाशी गँगस्टर जोहरा फरार होती. दरम्यान, रविवारी खबऱ्याने जोहराबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केले.
गंज पोलीस ठाण्याचे प्रभारी लव्ह सिरोही यांनी सांगितले की, याप्रकरणी हनी ट्रॅपच्या गुन्ह्यान्वये आरोपींना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले होते. आता, पोलिसांनी जोहराला अटक केली आहे. सीमा आणि जोहरा या दोघींकडून अश्लील फोन कॉलद्वारे ब्लॅकमेल केले जात होते. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, असे सिरोही यांनी सांगितले.