Lok sabha Election Result 2024 : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ब्रिजभूषण यांना तिकीट देणे भाजपने टाळले. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. नामांकित महिला पैलवानांनी ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करताना सडकून टीका केली होती. ब्रिजभूषण शरण सिंह नाना कारणांनी चर्चेत असतात. नामांकित महिला पैलवानांनी केलेले गंभीर आरोप, आंदोलनं यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यांचे चिरंजीव करण भूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज या जागेवरून चांगली आघाडी घेतली.
मतदानाची मोजणी प्रक्रिया सुरू असून करण यांनी पहिल्या कलांमध्ये मजबूत आघाडी घेतली. करण भूषण सिंह हे १ लाख ४२ हजार ३२७ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे उमेदवार भगत राम आहेत.
करण भूषण सिंह म्हणाले की, मी कैसरगंज येथील जनतेचे आभार मानतो. माझ्या वडिलांनी मागील ३० वर्ष केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यांनी घेतलेले कष्ट यामुळेच मला हे यश मिळाले.
अलीकडेच करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे अपघातानंतर, करण भूषण घटनास्थळी थांबले नाही. मात्र, पोलीस स्कॉर्ट असे लिहिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील करनैलगंज कोतवाली भागातील करनैलगंज हुजूरपर मार्गावर करण भूषण यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. याच वेळी वैकुंठ महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाने चिरडले. मग वाद चिघळताच करण यांनी स्पष्टीकरण देत संबंधित मुले माझ्या वाहनापासून दूर असल्याचे सांगितले.