उत्तर प्रदेशभाजपाने राज्यसभेच्या 7 जागांसाठी 35 नावांची यादी तयार केली आहे. नेते सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावासोबतच या यादीमध्ये कवी कुमार विश्वास यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कुमार विश्वास राजकीय वर्तुळात दिसण्याची शक्यता आहे.
सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा झाली. भाजपाने सात जागांसाठी 35 उमेदवारांचे पॅनल तयार केले असून, त्यात सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचाही समावेश आहे. तसेच, कुमार विश्वास यांचेही नाव यादीमध्ये असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
कुमार विश्वास गाझियाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात आहे. आता अशा परिस्थितीत त्यांना राज्यसभेवर पाठवणार की लोकसभेसाठी उमेदवारी करणार, यावर सस्पेन्स कायम आहे. उत्तर प्रदेशमधून राज्यसभेच्या 10 जागा रिक्त होत आहेत, त्यापैकी सात जागा भाजपाच्या खात्यात तर तीन जागा समाजवादी पक्षाच्या खात्यात जातील.
दरम्यान, असे म्हटले जात आहे की, सात जागा भाजपाच्या आणि दोन जागा समाजवादी पक्षाला निश्चित मिळतील. मात्र, तिसरी जागा समाजवादी पक्ष जिंकू शकतो, पण जर भाजपाला तिसऱ्या जागेसाठी लढायचे असेल तर ते आठवा उमेदवार उभे करू शकतात. मुख्यमंत्री योगी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्या व्यतिरिक्त भूपेंद्र चौधरी आणि संघटनेचे सरचिटणीस धरमपाल सिंह उपस्थित होते. लवकरच केंद्रीय समितीकडे ही सर्व 35 नावे पाठवली जाणार आहेत. त्यापैकी 7 नावांना भाजपा हायकमांडकडून मान्यता दिली जाणार आहे.