भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारी यादीमध्ये उत्तर प्रदेशमधील ५१ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र आता उर्वरित २४ जागांसाठी भाजपाकडून खलबतं सुरू आहेत. केंद्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशमधील उर्वरित जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबत माहिती मागवली होती. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, महामंत्री संघटना धर्मपाल आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पॅनेलने संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार करून पाठवली आहे. या २४ जागांसाठी प्रत्येकी तीन नावं पाठवण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठ येथील विद्यमान खासदार राजेंद्र अग्रवाल यांचं तिकीट कापण्यात येणार आहे. तिथून अभिनेते अरुण गोविल किंवा कुमार विश्वास यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, प्रयागराज येथून रीटा बहुगुणा जोशी यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाही. येथून अभिलाषा गुप्ता यांना उमेदवारी मिळू शकते. गाझीयाबाद येथून जनरल व्ही.के. सिंह यांचं तिटीक कापलं जाऊ शकतं. त्यांच्या जागी अनिल अग्रवाल किंवा अनिल जैन यांना उमेदवारी मिळू शकते. तर रायबरेली येथून समाजवादी पार्टीचे बंडखोर नेते मनोज पांडेय यांना उमेदवारी मिळू शकते. कैसरगंज येथून वादग्रस्त बृजभूषण शरण सिंह यांचं तिकीट कापलं जाणंही निश्चित आहे. त्यांच्या जागी त्यांची पत्नी केतकी देवी सिंह किंवा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी मिळू शकते.
नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेश मिश्रा यांना भदोही येथून उमेदवारी मिळू शकते. तर गेल्या काही काळात पक्षविरोधी विधाने करणाऱ्या वरुण गांधी यांची पक्षनेतृत्वाशी चर्चा झाली असून, त्यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. तर सुल्तानपूर येथून मनेका गांधी यांना उमेदवारी मिळू शकते.
सहारनपूर येथून माजी मंत्री सुरेश राणा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. देवरिया येथून रमापती राम त्रिपाठी यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. मिर्झापूर येथून अनुप्रिया पटेल पुन्हा मैदानात असू शकतात. घोसी येथून अरविंद राजभर निवडणूक लढू शकतात. बलिया येथील खासदार बीरेंद्र सिंह यांचं तिकीट कापले जाण्याची संकेत मिळत आहेत. त्यांच्या जागी नीरज शेखर किंवा आनंद शुक्ला यांना उमेदवारी मिळू शकते. त्याचप्रमाणे कानपूरमध्ये सत्यदेव पचौरी यांच्याऐवजी त्यांची मुलगी नीतू सिंह यांना तिकीट दिलं जाऊ शकतं. गाझीपूर येथून मनोज सिन्हा यांचे पुत्र अभिनव सिन्हा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.