नरेंद्र मोदींविरोधात तगडा उमेदवार देण्याची काँग्रेसची तयारी, UP मध्ये १७ जागांसाठी ही नावं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:44 AM2024-02-23T11:44:15+5:302024-02-23T11:45:06+5:30
Congress candidate For Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत जागावाटपाबाबतच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आता राज्यातील संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी सुरू केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत जागावाटपाबाबतच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आता राज्यातील संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसलाउत्तर प्रदेशमध्ये झालेल्या जागावाटपामध्ये १७ जागा मिळाल्या आहेत. तसेच या जागांपैकी ९ जागांवर काँग्रेसने आपले उमेदवारही जवळपास निश्चित केले आहेत. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय हे यावेळीही वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देताना दिसण्याती शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
तसेच काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून इम्रान मसूद आणि सीतापूर येथून राकेश राठोड यांची उमेदवारीही जवळपास निश्चित आहे. इम्रान मसूद यांना काँग्रेसने २०१९ मध्येही उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर मसूद हे सपा, बसपा असा प्रवास करत पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. तर सीतापूर येथून काँग्रेसचे माजी आमदार राकेश राठोड यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे.
त्याच प्रमाणे लखनौजवळच्या बाराबंकी येथून तनुज पूनिया, झाशी येथून माजी खासदार प्रदीप जैन, गाझियाबाद येथून डॉली शर्मा, महाराजगंज येथून आमदार वीरेंद्र चौधरी, फतेहपूर सिक्री येथून रामनाथ सिकरवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. कानपूर शहर लोकसभा मतदारसंघामध्ये आलोक मिश्रा, अजय कपूर, विकास अवस्थी आणि करिश्मा यांच्यामधून एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते.
त्याचप्रमाणे मथुरा, देवरिया, बांसगांव आणि बुलंदशहर येथील जागांवरून प्रत्येकी दोन नेत्यांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली असून, त्यातील प्रत्येकी एकाला तिकीट देण्यात येणार आहे. मथुरा येथून प्रदीप माथूर आणि पंडित राजकुमार रावत यांची नावं उमेदवारीच्या शर्यतीत पुढे आहेत. तर देवरिया येथून अखिलेख प्रताप सिंह आणि माजी प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. बांसगाव (राखीव) येथून कमल किशोर आणि अनूप प्रसाद यांच्यापैकी एकाला काँग्रेसकडून संधी दिली जाऊ शकते. प्रयागराज येथून मनोज यादव यांचं नाव चर्चेत आहे. तर अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवारांबाबत काँग्रेसचं नेतृत्व निर्णय घेणार आहे. या जागांसाठी कुठल्याही नावांची सध्यातरी चर्चा करण्यात आलेली नाही.