लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच आता उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेसची (TMC) एंट्री झाली आहे. समाजवादी पक्षाने टीएमसीला भदोहीची जागा ऑफर केली आहे. या बदल्यात टीएमसी सपाला पश्चिम बंगालमध्ये एक जागा देऊ शकते.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरण मय नंदा यांनी भदोही मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून ललितेश पती त्रिपाठी यांच्या उमेदवारीची पुष्टी केली आहे. यूपीमधील जागावाटपासंदर्भात सपा आणि काँग्रेस यांच्यात यापूर्वीच चर्चा झाली आहे. काँग्रेस राज्यात 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
ललितेश पति त्रिपाठी यांनी घेतली होती अखिलेश यादव यांची भेट -यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत यापूर्वीच चर्चा केली होती. खरे तर, ममता बॅनर्जी ललितेश यांना उत्तर प्रदेशातील चंदौली लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याच्या तयारीत होत्या. यानंतर, त्रिपाठी यांनी नुकतीच सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
ललितेश यांनी कमलापती त्रिपाठी यांचा वारसा चालवावा आणि चंदौलीतून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी ममतांची इच्छा होती. कारण चंदौली ही ललितेशपती त्रिपाठी यांचे अजोबा आणि दिग्गज काँग्रेस नेते कमलापति त्रिपाठी यांची कर्मभूमी आहे. येथील लोक आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतात. महत्वाचे म्हणजे, ललितेश यांच्या आजी चंद्रकला त्रिपाठी देखील चंदौलीतून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यामुळे ललितेश यांनीही चंदौलीतून निवडणूक लढवावी अशी ममतांची इच्छा होती.