लोकसभा सदस्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये यावेळी मतदार नेमका काय कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या अनेक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून लगबग सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्ष एका विचित्र अडचणीत सापडला होता. सपाने आधी एस.टी. हसन यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज पक्षाने रुची वीरा यांना पक्षाचं चिन्ह दिल्याने त्याही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखक झाल्या. त्यामुळे मतदारसंघात हायहोल्टेज ड्रामा सुरू झाला होता.
एकीकडे अखिलेश यादव यांनी रुची वीरा यांना उमेदवारी दाखल करू नका. असे फोनवरून सांगितले होते. त्यासाठी त्या तयारही झाल्या होत्या. मात्र आता त्या उमेदवारी अर्ज दाखल करणय्साठी निघाल्याने खळबळ उडाली. याबाबत प्रसारमाध्यमांनी रुची विरा यांना विचारले असता अखिलेश यादव यांनीच आपल्याला मुरादाबाद येते पाठवले, असे सांगितले. अखिलेश यादव यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करू नका, असे सांगितल्याचे वृत्त रुची वीरा यांनी फेटाळून लावले. तसेच एस.टी. हसन बे आपले मोठे भाऊ आहेत, असे विधान रुची वीरा यांनी केले.
दरम्यान, दिवसभर राजकीय नाट्य सुरू राहिल्यानंतर अखेरीस संध्याकाळी समाजवादी पक्षाने रुची वीरा यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तसेच एस.टी. हसन यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे मुरादाबाद मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षात असलेले राजकीय नाट्य संपुष्टात आले आहे. एस.टी. हसन यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र मला उमेदवारी मागे घेण्यास का सांगण्यात आले याबाबत अखिलेश यादव हेच चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात, असं विधानही त्यांनी केली आहे.