Lok Sabha Election 2024: आगामी काळात लोकसभेची निवडणूक होणार असून, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ज्या उत्तर प्रदेशातून भारताच्या सत्तेचा मार्ग जातो, तिथे सत्ताधारी भाजपाची ताकद आणखीच वाढली आहे. कारण जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल (RLD) एनडीएमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक (८०) लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात 'इंडिया' आघाडीच्या अडचणी वाढल्याचे दिसते. RLD चे प्रमुख जयंत चौधरी यांनी अखेर सोमवारी NDA मध्ये सामील होण्याची घोषणा केली. ते एनडीएमध्ये सामील झाल्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणूक समीकरणे देखील पूर्णपणे बदलणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि पीव्ही नरसिंह राव यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली होती. यासोबतच शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती.
देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, इथे लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. चौधरी चरणसिंह हे उत्तर प्रदेशचे भूमिपुत्र असून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आपल्या राजकीय जीवनात प्रथम आमदार बनून त्यांनी संसदीय कामाला सुरुवात केली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी देशासाठी काम केले. आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध त्यांनी उघडपणे भूमिका घेत आणीबाणीला विरोध केला होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केल्याचे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार जाहीर करताना म्हटले होते.