- बाळकृष्ण परबअनेक दिवस संभ्रवाचं वातावरण आणि राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवून झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. मात्र राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे संकेत मिळत असताना पक्षाने त्यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी दिली गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधी यांना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी जाहीर करण्यामागची अनेक कारणं समोर येत आहेत. त्यामधील महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय आणि मतांचं गणित.
अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. मात्र २०१४ नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीत येथील काँग्रेसचा येथील जनाधार आक्रसत गेलाय. येथील मागच्या दहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना कडवी टक्कर दिली होती. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी १ लाख ७ हजार ९०३ मतांनी विजय मिळवला होता. मात्र राहुल गांधी यांच्या मताधिक्यामध्ये कमालीची घट झाली होती. पण २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना पराभवाचा धक्का देताना ५५ हजार १२० मतांनी सनसनाटी विजयाची नोंद केली होती.
अमेठीमधील सध्याचं राजकीय गणित पाहिल्यास सद्यस्थितीत अमेठी लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नाही. येथे भाजपाचे तीन आणि समाजवादी पक्षाचे २ आमदार आहेत. २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मदारसंघात मिळून भाजपाला ४ लाख १८ हजार ७०० एवढी मतं मिळाली होती. तर त्याखालोखाल समाजवादी पक्षाला ३ लाख ५२ हजार ४७५, तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला १ लाख ४२ हजार ९५२ एवढी मतं मिळाली होती. तर बसपाला केवळ ४५ हजार ७२७ एवढं मतदान झालं. एकूणच काँग्रेस पक्षाला येथे विजय मिळवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या सहकार्यावर विसंबून राहावं लागलं असतं.
दुसरीकडे रायबरेली मतदारसंघात मात्र काँग्रेससाठी काहीशी अनुकूल परिस्थिती आहे. १९७७, १९९६ आणि १९९८ या तीन निवडणुकांचा अपवाद वगळता येथे काँग्रेसला सातत्याने यश मिळालेले आहे. सोनिया गांधी यांनी २००४ ते २०१९ अशा सलग ५ निवडणुकांत येथून विजय मिळवलेला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदीलाटेमध्येही सोनिया गांधी यांनी मोठ्या मताधिक्याने येथून विजय मिळवला होता. पण २०१९ मध्ये सोनिया गांधी यांच्या मताधिक्यात मोठी घट होऊन ते १ लाख ६७ हजारांपर्यंत खाली आले होते. या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास येथील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा एकही विद्यमान आमदार नाही आहे. येथे समाजवादी पार्टीचे ४ तर भाजपाचा एक आमदार आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास इथे समाजवादी पक्षाला ४ लाख २ हजार २७९ मतं मिळाली होती. तर भाजपाला ३ लाख १८ हजार ६९० एवढं मतदान झालं होतं. रायबरेलीमध्येही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. येथे काँग्रेसला १ लाख ४० हजार ७०६ मतं मिळाली होती. तर बहुजन समाज पक्षालाही एकूण १ लाख ३ हजार २४३ एवढं मतदान झालं होतं. एकंदरीत रायबरेलीमध्येही काँग्रेस आणि राहुल गांधी यांची मदार ही अखिलेश यादव यांच्याकडून होणाऱ्या सहकार्यावर असणार आहे. मात्र समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीत असून, उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेस आणि सपा एकत्रित निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही लढाई काहीशी सोपी असेल.
रायबरेलीमधून राहुल गांधींसमोर भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांचं मुख्य आव्हान असेल. तर बसपाने ठाकूर प्रसाद यादव यांना उमेदवारी देऊन ही लढत तिरंगी केली आहे. त्यामुळे बसपाच्या उमेदवाराने काही प्रमाणात मतविभाजन घडवून आणल्यास त्याचा फटका राहुल गांधी यांना काही प्रमाणात बसू शकतो. पण गांधी कुटुंबीयांबाबत येथील मतदारांमध्ये असलेला आपलेपणा. सोनिया गांधी यांनी २००४ पासून येथे राखलेलं वर्चस्व आणि समाजवादी पक्षाचा भक्कम पाठिंबा असल्याने रायबरेलीमधील निवडणूक तितकीशी अवघड जाणारा नाही.