सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल ही आवश्यक बाब बनली आहे. लोक मोबाइलच्या माध्यमातून अनेक गोष्टी घरबसल्या करत असतात. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोबाइल हा आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बहराइचमध्ये एक असा भाग आहे जेथील सुमारे ३० हजारांहून अधिक लोक मोबाइलशिवाय जीवन जगत आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांना आता त्यांचे नातेवाईकही टाळू लागले आहेत. एवढंच नव्हे तर या भागातील तरुणांसोबत लग्न करण्यासही तरुणी तयार होत नाही आहेत.
हा भाग बहराइच जिल्ह्यातील मोतीपूर तालुक्यातील इंडो-नेपाळ सीमा परिसरात आहे. या भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सरकारकडून अनेक योजनांचा लाभ मिळतो. मात्र दूरसंचार व्यवस्था नसल्याने हा भाग बाह्य जगापासून तुटला आहे. मोबाइल नेटवर्कच्या समस्येबाबत येथील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र या समस्येवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सुमारे ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागातील ग्रामस्थांनी आता जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
या भागात बर्दिया, आमा, विशुनापूर, फकीरपुरी, बिछिया, रमपुरवा मटेही, भवानीपूर, कैलाश पुरी, भरथारपूर या गावांचा समावेश होतो. तसेच इथे सुमारे ३० हजारांहून अधिक ग्रामस्थ राहतात. ते सातत्याने मोबाइलच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करत आहेत. या गावांमधील सरपंचांनीही ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
येथील ग्रामस्थांना सरकारी योजनांमधून खूप लाभ मिळाला आहे. मात्र येथे मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. बिछिया येथे बीएसएनएलचा एक टॉवर आहे. मात्र तो कार्यान्वित झालेला नाही, आता येथील ग्रामस्थांकडून खाजगी कंपनीचा टॉवर लावण्याची मागणी केली जात आहे. येथील ग्रामस्थांनी आपली समस्या मांडताना सांगितलं की, येथे राहत असलेल्या तरुण तरुणींना लग्न करण्यासाठी जोडीदार मिळत नाही आहे. जे नातेवाईक आहेत. त्यांचं नातेवाईकांशी बोलणं होत नाही आहे. आम्ही लोक देश आणि जगापासून तुटलेले आहोत, अशी व्यथाही या लोकांनी मांडली.